सोलापूर : दि.१५ (प्रतिनिधी) श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अनधिकृत चिमणी पाडकामात अडथळा निर्माण करुन गुन्हा करण्याची शक्यता असल्याने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन,संचालक व कर्मचाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हा व सत्र सत्र न्यायालयाने रद्दबातल केला.
यात हकिकत अशी की,श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याचे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आदेश दिल्यावरून दि.11/6/2023 रोजी चिमणी पाडकामाचे कामास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे चिमणी पाडकामात अडथळा निर्माण करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असल्याचे सांगून एमआयडीसी पोलीस ठाण्यात श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सिद्धाराम बाबुराव चाकोते, संचालक अमर रतिकांत पाटील व महादेव रेवणसिद्धप्पा जम्मा यांच्यासह माजी संचालक सुधीर आण्णाराव थोबडे व कर्मचारी परमेश्वर हनुमंत हिरापुरे नागनाथ देवराव पाटील व रेवणसिद्ध रामचंद्र कारकले यांना दिनांक 13/ 06/ 2023 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक 14/ 06 / 2023 रोजी पोलिसांनी वरील कारणे नमूद करून सर्वांना पंधरा दिवस स्थानबद्ध करण्याकरिता सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अहवाल सादर केला होता,यावरून न्यायालयाने सर्वांना दिनांक 19/06/2023 पर्यंत स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित करून कोठडीत रवानगी केली होती. त्यामुळे अर्जदारांनी अॅड.मिलिंद थोबडे यांच्यामार्फत सत्र न्यायालयामध्ये कोठडीतून सुटका होण्याकरिता अर्ज दाखल केला होता.
सदर अर्जाच्या सुनावणी वेळी अॅड मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तीवादामध्ये भारतीय राज्यघटनेने सर्वांना मुक्तपणे संचार करण्याचा हक्क व अधिकार प्राप्त असून पोलिसांनी केलेली कारवाई ही कायदेशीर हक्कांचे हनन करणारी आहे व त्यामुळे अन्यायकारक आहे असे सांगून वादातील चिमणी पाडकामाचे काम पूर्ण झालेले असल्याने अर्जदारांना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे मुद्दे मांडले, त्यास सरकार पक्षाने देखील हरकत नसल्याचे न्यायालयास कळवले. यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांनी अर्जदारांना मुक्त करण्याचे आदेश दिले.
यात अर्जदारातर्फे अॅड.मिलिंद थोबडे अॅड.विनोद सूर्यवंशी अॅड.राजकुमार मात्रे यांनी तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.

0 تبصرے