Ticker

6/recent/ticker-posts

आकांक्षित तालुक्यांतील 38 उद्दिष्टे वेळेत पूर्ण करा; विभागांनी समन्वयाने काम करावे - सीईओ कुशल जैन


सोलापूर : जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित करण्यात आलेली 38 उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेमार्फत नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत आकांक्षित तालुक्यांतील विविध विकासकामांचा आणि निर्देशांकांवरील प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम,सांगोल्याचे सहायक गटविकास अधिकारी वसंत फुले यांच्यासह जिल्हास्तरीय विभागप्रमुख,तालुकास्तरीय अधिकारी, आरोग्य, महिला व बाल विकास,शिक्षण,कृषी,पशुसंवर्धन, पाणीपुरवठा,ग्रामविकास आदी विभागांचे अधिकारी तसेच तालुका फेलो कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत सीईओ कुशल जैन यांनी आरोग्य,पोषण,शिक्षण, कृषी,पर्यावरण,पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील विविध निर्देशांकांचा आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी कामकाजात गती आणण्यावर त्यांनी भर दिला.

केंद्र शासनाने देशातील 513 मागास तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला असून, महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा या कार्यक्रमात समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट,करमाळा आणि सांगोला हे तीन तालुके या कार्यक्रमाचा भाग आहेत.

यावेळी सांगण्यात आले की, नीती आयोगाच्या राज्यस्तरीय क्रमवारीत अक्कलकोट तालुका तिसऱ्या क्रमांकावर असून, सांगोला तालुक्यानेही उल्लेखनीय प्रगती केली आहे. या कार्यक्रमात आरोग्य,महिला व बालकल्याण,शिक्षण,कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाशी संबंधित निर्देशांकांवर विशेष भर देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांसाठी 38 निर्देशांकांच्या आधारे नियमित आढावा घेतला जात आहे. बैठकीत प्रत्येक विभागाने आपल्या कामगिरीचे सादरीकरण केले. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करून शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखत आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्ह्यातील आकांक्षित तालुके विकासाच्या शर्यतीत अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے